ऐपत
रोज रात्री कामावरून परत येताना त्याला ते हॉटेल दिसायचे. खरेतर त्या महानगरीत अनेक मोठी हॉटेले होती, पण या टुमदार जागेची भुरळ और होती. शेटजींच्या घरी अनेक वर्तमानपत्रे असायची त्यातल्या गुळगुळीत पानांवरच्या फोटोतल्यासारख्या बायका व ऐटबाज कपडे घातलेले पुरुष हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून ये जा करताना बघायला मिळायचे. लांब उभे राहून दोनपाच मिनिटे ते निराळे जग बघायला त्याला आवडायचे, का कुणास ठाऊक पण स्वतःच्या दैन्याचा विसर पडायचा. त्या भाग्यवानांबद्दल असूया न वाटता उलट जगात कुणाच्या तरी वाट्याला सुख आहे या भावनेने तोही आनंदून जायचा. आपणही या माणसांसोबत याच हवेत श्वास घेतोय, याच फूटपाथवर चालतोय याचे अप्रूप वाटायचे.
गेले काही दिवस मात्र तो अस्वस्थ होता. त्या हॉटेलात जाऊन आत बघायची उत्सुकता वाढली होती. असे केल्याने आपल्या चरकातल्या चिपाडासारख्या आयुष्याला एक आगळी झळाळी मिळणार आहे, असा काहीतरी विश्वास त्याला वाटू लागला होता. दिवसभर मरून काम करताना, रात्री राजम्माच्या खानावळीत जेवून खोलीकडे परतताना आणि पाच सहा तासाच्या चिंधीएवढ्या झोपेतही त्या हॉटेलच्या गुळगुळीत काचा, वेगळ्या आकाराचे दिवे आणि रंगीत रसरशीत माणसे त्याला त्रास देऊ लागली होती.
तडक तो आत गेलाही असता पण दोन मोठ्या समस्या होत्या. हॉटेलच्या दारात आलटून पालटून उभे राहणारे दोन मिशाळ, धिप्पाड दरवान होते. त्यांचे चेहरे वेगळे असले तरी केसाळ उग्र मिशा सारख्या होत्या. कधीकधी त्याला त्या मिशाच दरवानी करत आहेत आणि बाकी शरीरे निमित्तमात्र आहेत असे काहीतरी विचित्र वाटे.
दुसरी बाब म्हणजे पैसा. त्याने मागच्या शेटजीकडे ड्रायव्हरकी केली होती. कुठली गाडी असली म्हणजे मग्रूर नवश्रीमंती असते, कुठल्या गाडीला जाळून टाकले तरी संपणार नाही असे पिढ्यांचे खानदानी ऐश्वर्य लगडलेले असते याची जाण त्याला होती. केवळ असे धनिक ज्या हॉटेलात येतात तिथले खाणे जेवणे किरकोळ दराचे नसणार याची कल्पना होती पण नक्की किती लागतील याचा अंदाज येत नव्हता. मात्र दराची माहीती काढेपर्यंत थांबणे अशक्य होते. लवकरच हॉटेलात गेलो नाही तर आपण राजम्माच्या नवऱ्यासारखे ठार वेडे होऊ, गल्लीतल्या लेखूसारखे पांगळे होऊन चाकाच्या फळकुटावर सरपटायला लागू किंवा शेटजींच्या हाफ मॅड बहिणीसारखे नेहमी त्याच त्या गोष्टी पुटपुटत राहू अशी वेडी भीती त्याला खाऊ लागली होती.
आज पगाराचा दिवस होता. पैसे हातात मिळताच त्याने शेटजींना सांगून लवकर सुट्टी करून घेतली आणि धावत खोली गाठली. मुद्दाम सकाळी आंघोळ केली नव्हती, ती उरकली आणि एकुलती एक ठेवणीतली पँट आणि पांढरा इस्त्रीचा शर्ट घातला. पैशाची चाचपणी करण्यासाठी त्याने जुन्या शर्टच्या खिशात हात घातला. पैशाचे पाकीट विकत घ्यावे लागेल इतकी सुबत्ता त्याच्या नशिबात नव्हती. आठ हजार पगार. सकाळचा चहा आणि दुपारचे जेवण शेटजींकडे उरकत असले तरी रात्रीचे जेवण आणि सुट्टीच्या दिवशीचे खाणे मिळून दोनेक हजार लागायचे. ती टीचभर खोली राजम्माच्याच नातेवाईकाची होती, त्याचे दीड हजार भाडे राजम्मा घ्यायची. घरी अडीच हजार पाठवून दिले की वट्ट दोन हजार उरायचे त्यात बाकीचे खर्च भागवायचे. त्यामुळे एक दोन आठवडे गेले की खिशात मावतील इतकेच पैसे उरणार त्यासाठी पाकीट घेणे आणि ते गर्दीत कोणी उडवू नये म्हणून काळजी घेणे त्याला निरर्थक वाटत असे.
खरेतर किती पैसे न्यायचे हा विकल्प नव्हताच. शिल्लक राहणारे दोन हजार फक्त त्याचे होते. राजम्माच्या तो अडीनडीला कामासाठी उपयोगी पडत असला तरी उधारी ठेवली असती तर तिने हाकलून लावायला कमी केले नसते. घरी पैसे पाठवले नसते तर आईबाप उपाशी मेले असते.
पाचशेच्या चार नोटा वरच्या खिशात आणि बाकी पैसे राजम्माकडे ठेवायला देऊन तो हॉटेलकडे वळला. राजम्मा त्याचा चकचकीत अवतार बघून थोडी आश्चर्यात दिसली पण खानावळीची संध्याकाळची लगबग सुरू झाल्याने तिला उहापोह करायला वेळ नव्हता.
हॉटेलच्या दारात पोचताच त्याचा पाय घोटाळला. त्याच्यापुढे चार-पाच देशी-विदेशी माणसांचा एक घोळका होता. दरवानाने कडक सलाम मारत त्यांना आत सोडले, एक कोट टायवाला देखणा माणूस त्यांना अभिवादन करत आत घेऊन गेला.
धीर एकवटून त्याने पायऱ्या चढायला सुरुवात केली. होता होईतो मिशाळबाबाकडे न बघता दार उघडून चटकन आत जायचा त्याचा विचार होता. मोठाल्या तपकिरी काचेच्या दरवाज्याला हात घालणार इतक्यात त्याच्या खांद्यावर एक मजबूत हात पडला.
"बाहेर उभा रहा", खर्जातला खरखरीत आवाज त्याच्या कानात घुमला.
"बाहेर उभा रहा", खर्जातला खरखरीत आवाज त्याच्या कानात घुमला.
"काय? अहो मला आत जायचेय, पैसे आहेत माझ्याकडे".
"रस्त्यावर उभा रहा जा थोडा वेळ, निघ बघू". खांद्यावरचा दाब वाढला होता आणि आवाजातली जरबही. त्याला एकदम टाचणी लागल्यासारखे वाटले. शिवाय थोडा वेळ रस्त्यावर उभा रहा म्हणजे काय, हेही नीट कळले नव्हते पण विरोध करायची हिंमत नसल्याने तो चुपचाप समोरच्या फूटपाथवर उभा राहिला. हॉटेलच्या आत जाऊ न शकल्याचा राग, दरवानाची भीती आणि स्वतःच्या कळकट कंगालीची असहायता याचे मिश्रण त्याच्या मेंदूला बधीर करत होते. किती वेळ गेला काय माहीत, पण पुन्हा खांद्यावर तीच मजबूत पकड जाणवली.
"आरं झोपलास काय हुभ्या हुभ्या? न्हाई नव्हं ? ये मग मागनं बिगी बिगी".

त्याने क्षणभर ओळखलेच नव्हते. आवाज आणि मिश्या त्याच होत्या पण डोक्याला थोरले मुंडासे आणि पायघोळ अंगरखा नसल्याने दरवान आता बराच साधा दिसत होता.
दरवानाने त्याचा हात धरत दोन लांब ढेंगा टाकून रस्ता ओलांडला आणि समोरच्या गल्लीच्या आडबाजूला असलेल्या पानाच्या दुकानावर आल्यावरच त्याला मोकळे सोडले.
दरवानाने त्याचा हात धरत दोन लांब ढेंगा टाकून रस्ता ओलांडला आणि समोरच्या गल्लीच्या आडबाजूला असलेल्या पानाच्या दुकानावर आल्यावरच त्याला मोकळे सोडले.
"शिग्रेट वढतोस काय रं?की विडी?"
"न- नाही, काहीच नाही"
"हात तुझी", म्हणत दरवानाने पानवाल्याकडून एक सिगरेट घेतली. बाजूला जळत्या दोरीवर भकभक करून पेटवली आणि त्याला टपरीच्या बाजूला यायची खूण केली.
"न- नाही, काहीच नाही"
"हात तुझी", म्हणत दरवानाने पानवाल्याकडून एक सिगरेट घेतली. बाजूला जळत्या दोरीवर भकभक करून पेटवली आणि त्याला टपरीच्या बाजूला यायची खूण केली.
"हां, बोल बाबा, कशापायी जात हुतास हाटीलात?", मिश्यांएवढा मोठा झुरका छातीत खोलवर ओढत दरवानाने प्रश्न केला.
" का म्हणजे? जेवायला जात होतो. मला का थांबवलेत तुम्ही? अहो पैसे आहेत माझ्याकडे".
" का म्हणजे? जेवायला जात होतो. मला का थांबवलेत तुम्ही? अहो पैसे आहेत माझ्याकडे".
दरवान मिशीत हसला.
"आसतील रे सोन्या, पर तुला हितली काय म्हायती हाय का? काय खायाचं, किती बिल हुनार यातलं कायसुदीक कळतं का? तुला लय दीस झाले बघतुय, माझ्या डुटीच्या वक्तालाच नेमका हॉटेलसमोर चकरा मारत आसतोयस. बाबा असल्या जागा गरीबांसाठी नसत्यात. महिन्याभराचा खिसा खाली हुईल हितं तासाभरात. भला माणूस दिसतोस, म्हणून सांगावसं म्हणलं"
दरवानाची सिगरेट संपली होती आणि कदाचित बोलणेही. सिगरेटचे पैसे देऊन दरवान त्याचा हात किंचित दाबत गल्लीच्या आत निघून गेला.

झालेले बोलणे आठवत तो पुन्हा रस्त्याकडे आला. एका बाजूने दरवानाचे बोलणे त्याला पटत होते पण कळून न वळल्याची स्थिती होती; आत जाण्याची इच्छा जास्तच प्रबळ होत होती. त्यापुढे इतर सर्व फिके वाटत होते.
यावेळी पायऱ्या चढताना का कुणास ठाऊक , त्याला अजिबात भीती वाटली नाही. दरवानाकडे थेट न बघता पण ठाम पावलांनी तो दरवाज्याकडे गेला. आपसूक दार उघडले गेले आणि त्याच्यामागे बंदही झाले.
गारव्याने त्याला एकदम शिरशिरी आली. आतले वातावरण काही निराळेच होते. अंधाराची सवय व्हायला थोडा वेळ लागला.
"टेबल फॉर वन?",
समोरच्या अंधारातून एक आवाज किणकिणला. डोळे मोठे करत त्याने अंदाज घेतला. समोरच्या डेस्कमागे एक मध्यमवयीन पण अतिशय तरतरीत हसतमुख बाई उभी होती.
समोरच्या अंधारातून एक आवाज किणकिणला. डोळे मोठे करत त्याने अंदाज घेतला. समोरच्या डेस्कमागे एक मध्यमवयीन पण अतिशय तरतरीत हसतमुख बाई उभी होती.
"व्हेअर वुड यु लाईक टु सिट, सर? इज इट बार्बेक्यू, लाऊंज ऑर डायनर रेस्तरॉं यु विश टु एंजॉय टुडे?"
आता थोडे दिसू लागले होते. डेस्कमागे मोठे कॉरीडॉर होते आणि तीन मोठ्या खोल्यांमध्ये तिथून वाट जात होती. डावीकडील दोन खोल्यांतून गर्दीचा आवाज येत होत्या. हॉटेलात बसायच्या तीन वेगवेगळ्या जागा होत्या आणि समोरची झुळझुळीत बाई त्याबद्दलच काही बोलतेय इतके कळण्याइतका व्यवहारचतुर तो नक्की होता पण या तीन जागा कोणत्या आणि तिथे जाऊन काय करायचे हे काही ठाऊक नसल्याने तो गप्प उभा होता.

बाईलाही तो आता व्यवस्थित दिसत होता. त्याचा पेहराव आणि एकूण व्यक्तित्व बघून तिचे हसू क्षणभर थिजले पण दुसऱ्याच सेकंदाला ती पुन्हा प्रसन्न हसली. त्याच्यामागे पाहत तिने आवाज दिला,
" रघु? काईन्डली टेक सर टू द डायनर, वुड यु प्लिज?"
अंधारात काही हलले आणि त्याच्या शेजारी कोट टाय घातलेला आणि तोंडावर तुच्छ भाव असलेला एक तरुण अवतीर्ण झाला. एका नजरेतच त्याला आपल्या खिशातले पैसे, गरीबी आणि सगळे काही कळून चुकले आहे असे काही वाटून तो उगीचच ओशाळला.

रघुने त्याला एका मोठ्या हॉलमध्ये आणून सोडले. आत किंमती खुर्च्या टेबले दिसत होती. भिंतींवर खाद्यपदार्थांचे आकर्षक फोटो आणि काहीबाही चित्रे होती. चकचकीत काटे चमचे सुऱ्या टेबलावर मांडून ठेवल्या होत्या. तिथे दुसरे कोणीही गिऱ्हाईक नव्हते त्यामुळे त्याला थोडे बरे वाटले. रघु मागे फिरताच त्याने दरवाज्याच्या सर्वात जवळचे टेबल निवडले आणि बसून इकडे तिकडे टकमक पाहू लागला.
रघुसारखेच कपडे घातलेला पण कितीतरी सौम्य चेहऱ्याचा आणखी एक युवक त्याच्याकडे आला. त्याच्या हातात दोन तीन जाड पुस्तके दिसली. निमिषार्धात त्याच्यासमोरील बशा आणि चमचे सराईतपणे बाजूला करत, पुस्तके समोर ठेवून आत कुठेतरी गायबसुद्धा झाला.
दोन मिनिटे ती पुस्तके उघडायचेही धाडस झाले नाही. भोवतालची श्रीमंती, भपका आता अंगावर येऊ लागला होता. जिथे येऊन काय खायचे, काय करायचे माहिती नाही तिथे आपण का आलो? ही शंका कुरतडू लागली होती.
उपाय नव्हता. मघाचा वेटर पुन्हा टेबलाकडे आला.
"हॅव यु डिसायडेड सर?", विचारत वेटरने न उघडलेल्या पुस्तकाकडे एक प्रश्नार्थक नजर टाकली.
"हॅव यु डिसायडेड सर?", विचारत वेटरने न उघडलेल्या पुस्तकाकडे एक प्रश्नार्थक नजर टाकली.
"भाईसाब, आप हिंदी बोलते क्या?", त्याने चाचरत विचारले.
वेटर आता मात्र खरा खुरा स्वच्छ हसला. सर्व काही समजल्यासारख्या आवाजात त्याने समोरच्या पुस्तकांविषयी थोडक्यात सांगितले. दोन पुस्तके बाजूला केली आणि तिसरे पुस्तक उघडत तो म्हणाला,
" ये देखो, इध्धर डिशेस का नाम लिखा है और इध्धरको कीमत, टॅक्स उप्परसे हुना, ठीक है?"

सर्व काही वळणदार इंग्रजीत लिहिले होते, त्याने असले काही पदार्थ ऐकलेही नव्हते. कहर म्हणजे उजवीकडे तेराशे चौदाशेच्याखाली एकही किंमत नव्हती.
त्याला काही सुधरत नव्हते. इथून बाहेर पडून गर्दीत हरवून जायची इच्छा बळावत चालली होती.
एका जागी बोट ठेवून त्याने कशीबशी ऑर्डर दिली.
"क्रेप? बहुत अच्छा सर, हमारा फ्रेंच शेफ मस्त बनाता ये डिश", असे म्हणत पुस्तके गोळा करून वेटर निघून गेला आणि तो एकेक क्षण कुरतडत बधीर बसून राहिला.

पाच मिनिटांनी एक झाकलेली मोठी प्लेट घेऊन वेटर बाहेर आला. आधी त्याने सोबतच्या देखण्या बरण्या सुबकपणे टेबलावर मांडल्या. त्याच्यापुढची बशी बाजूला केली आणि झाकण उघडत आतली प्लेट समोर ठेवली.
त्याने पदार्थाकडे नजर टाकली. नाक्यावरच्या मद्रास कॅफेत मिळणाऱ्या डोशासारखे समोर काहीतरी होते. त्याची चारी बाजूंनी अर्धी घडी घातलेली होती आणि घडीतून एक फोडलेले अर्धे शिजके अंडे, कसलीशी हिरवी भाजी आणि पांढरा कीस दिसत होता.
त्याच्या घशात एकदम आवंढा आला. चाळीस रुपयांत राजम्माकडे भाजी, आमटी, भात आणि दोन चपात्या मिळत. चव कशीही असली तरी पोट भरत असे. मद्रास कॅफेतही तो एकदोनदा गेला होता. तीस चाळीस रुपयांत तिथे इडली आणि भरपूर भाजी घातलेला डोसा खाता येत असे. पश्चात्तापाने त्याचे अंग फुलारून आले आणि टेबलावरचा मऊसूत टॉवेल तोंडात दाबत मोठ्याने रडावेसे वाटले.
झपाटून जात त्याने प्लेट समोर ओढली आणि काटे चमचे बाजूला सारत बकाबका घास तोडायला सुरुवात केली. अर्धे कच्चे अंडे, गोडसर हिरवी चटणी आणि लोणी यांची एक अनाकलनीय मिश्र चव तयार झाली होती जिच्यामुळे घास तोंडात फिरत होता. धड थुंकून टाकता येईना आणि आनंदाने खाताही येईना अशा कात्रीत सापडून तो पार सोलवटून गेला.
जेवण संपले कधी आणि वेटरने सांगितले तितके बिल भागवून तो बाहेर आला कसा, तिरीमिरीत समजलेच नाही. फूटपाथवर गाड्यांच्या कर्कश्श आवाजांनी तो भानावर आला तेव्हा त्याचे अंग थरथरत होते आणि वळलेल्या मुठीत शंभराच्या काही ओलसर नोटा आणि सुट्टी नाणी मलूल पडली होती.
खोलीकडे चालताना त्याला स्वतःच स्वतःची फसवणूक केल्यासारखे वाटून रडे आवरेनासे झाले. आपली ऐपत, श्रीमंतांच्या जगात पाऊलही टाकायची नसलेली लायकी आणि दैन्य यांची नव्याने जाणीव होऊन त्याला शरमल्यासारखे होत होते.
नाक्यावरचा दिवसभराचा कचरा आणि ओसंडून वाहणारी कचरापेटी बघून त्याला आणखी भडभडले. साला हीच आपली लायकी आणि हेच आपले जग. पेटीशेजारी पाय मुडपून झोपलेल्या कुत्र्यांविषयी एकदम सहानुभूती दाटून आली.
खोली उघडून त्याने कशीबशी वळकटी उघडली. अंथरूण सारखे न करताच तो उताणा पसरला. समोरच्या कॅलेंडरच्या फडफडत्या पानावरुन उरलेला भलामोठा महिना त्याला खिजवत चिडवत होता.
क्षणाच्या मोहापायी झालेल्या नुकसानामुळे त्याला देहभर ग्लानी आली. झापडून पाय मुडपून घेत झोपेच्या अधीन होताना त्या श्रीमंतांनी आपल्याला या दीनवाण्या जागेत असे पाहिले, तर त्यांना आपण नाक्यावरच्या उकिरड्याशेजारील कुत्र्यांसारखेच दिसू, ही बोचरी भावना मात्र त्याला शुद्ध हरपेपर्यंत उष्ण अश्रूंसोबत साथ देत राहिली.
Comments
Post a Comment